शास्त्रीय संगीत आणि तरूण पिढी

tabla

Tabla

मध्यंतरी ‘स्नॉव्हेल’ या बोलक्या पुस्तकांच्या ॲपवर झालेल्या परिसंवादात सहभागी झालो होतो. त्यात विचारलेल्या प्रश्नांना मी जी उत्तरं दिली त्याचं हे संकलन.

या परिसंवादात माझ्यासोबत डॉ. आशुतोष जावडेकर आणि विदुषी शुभदा पराडकर सहभागी झाले होते. संपूर्ण परिसंवाद तुम्हाला ‘स्नॉव्हेल’वर ऐकता येईल.

१) तरूण पिढीने शास्त्रीय संगीत शिकणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का?

मायकल नोव्हॅक या अमेरिकन तत्त्ववेत्त्याने असं म्हटलं होतं की “Tradition lives because young people come along who catch its romance and add new glories to it.” परंपरा टिकते कारण त्या परंपरेत सातत्याने काहीतरी नवं घडत राहतं. पं. सत्यशील देशपांडे यांनी एकीकडे असं म्हटलंय की ‘परंपरेचा पुनर्निर्माण म्हणजे कला!’ मला हे वाक्य फार भावतं. कारण काहीही नवीन निर्माण करायचं असेल तर परंपरा माहीत असायला हवी. अभिजात म्हणजे काय तर प्रत्येक पिढीला ज्याचा नव्याने अर्थ लावावासा वाटतो ते अभिजात! मला वाटतं की हिंदुस्थानी अभिजात संगीत ही आपली सनातन ओळख आहे. ज्या कारणासाठी आपली मातृभाषा शिकणं गरजेचं आहे, त्याच कारणासाठी तरूण पिढीने शास्त्रीय संगीत शिकणं गरजेचं आहे असं मला वाटतं.

मी भावसंगीतात आहे म्हणून त्या दृष्टीने जरा बोलतो. ज्यांना भावसंगीत करण्याची इच्छा आहे, त्यांनीसुद्धा अभिजात संगीताचा अभ्यास करायला हवा असं माझं मत आहे. उपज करणं, स्वरांची अचूक ओळख असणं आणि मुख्य म्हणजे दोन्ही प्रकारच्या संगीताच्या दिशा भिन्न असल्या तरी दोघांनाही त्याच शास्त्राचं अधिष्ठान आहे.

२) तरूण पिढीला आकर्षित करण्यासाठी शास्त्रीय संगीत शिक्षणपद्धतीत काही बदल केले जायला हवेत का?

परंपरेचा आधार वाटायला हवा, ओझं वाटायला नको. हिंदुस्थानी अभिजात संगीताची अभ्यासरचना ही पुस्तकी असू नये असं मला वाटतं. अमुक राग, मग या रागाचे आरोह-अवरोह, मग त्याची पकड, मग लक्षणगीत, मग बंदिश… त्या रागाची नियमावली यात गाणं नीरस आणि कोरडं होण्याची शक्यता वाढते. पुन्हा एकदा मला जरा इथे मातृभाषेशी याची तुलना करण्याचा मोह होतोय. आपण इंग्रजी शिकताना आधी अल्फाबेट, मग भाषा; आधी वाचायला मग बोलायला शिकतो. ही कृत्रिम पद्धत झाली. मातृभाषा शिकताना मात्र आपण आधी ती ऐकतो, मग बोलतो, मग वाचतो आणि नंतर लिहितो. आधी गाणं आणि मग व्याकरण, आधी रस नंतर नियम असाच क्रम खरं तर योग्य आहे. एखादी भाषा किंवा एखादा खेळ जसा आपण शिकतो तसं गाण्याचं शिक्षण झालं पाहिजे.

मला तर असं वाटतं की संगीत हा विषय शाळेत सगळ्यांनाच शिकवला गेला पाहिजे. फक्त तो शिकवताना, आहे तीही अभिरुची संपणार नाही ना? – ही काळजी घ्यायला हवी. कला संगीताची एक खासियत असते. ते प्रॉडक्ट नसतं. त्याचा आत्मा प्रक्रियेत असतो. त्यामुळे त्याचा उद्देश हा सांगितिक सौंदर्यमूल्य (aesthetic value) किंवा कलात्मक मूल्य (artistic value) निर्माण करणं हा असतो. एका अर्थाने ते परिष्कृत असतं. म्हणूनच केवळ कलाकार जाणता असून चालणार नाही; तर श्रोताही जाणता असायला हवा. आपण ‘रसिक’ हा शब्द फार वरवर आणि सगळ्यांसाठी वापरतो. पण कारागिरापासून कलाकारापर्यंतचा प्रवास जितका खडतर आहे तितकाच श्रोत्यापासून रसिक होण्यापर्यंतचा प्रवासही खडतर आहे! रसिकत्व कमवावं लागतं. म्हणूनच शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला हे दोन पैलू आहेत. इथे रसिकही शिक्षणानेच निर्माण होणार आहेत. केवळ ‘आवड’ हा अभिजात संगीताची अभिरुची तयार होण्याकरता पुरेसा निकष नाही. 

३) आजच्या तरूण पिढीचा शास्त्रीय संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे?

शास्त्रीय संगीतासाठी एक आवश्यक घटक म्हणजे वेळ. त्याचा आस्वाद जाता जाता घेता येत नाही. त्याला वेळ आणि एकाग्रचित्त असं दोन्ही द्यावं लागतं. तरुणांना प्रलोभनं खूप आहेत. जग माहितीचं आहे, पण माहितीवर पुरेशी प्रक्रिया झाली नाही तर माहितीचं ज्ञानात रूपांतर होत नाही आणि ज्ञान मुरू दिलं तरच त्याचं शहाणपणात रूपांतर होतं. यासाठी वेळ हवा! अभिजात संगीतातले गूढरम्य प्रदेश कुठल्याही तरुणाला खुणावू शकतात. फक्त जो वेळ त्याला द्यायला हवा तो द्यायलाच हवा! म्हणून मला ‘स्पिक-मॅके’ सारखे प्रकल्प खूप महत्त्वाचे वाटतात. शाळा-शाळांमधून, महाविद्यालयांतून ऐकणारे तयार झाले तर गाणारेही तयार होतील. आज मला जी तरूण मुलं-मुली शास्त्रीय संगीत शिकताना दिसतात त्यांच्यात मला या संगीतप्रकाराच्या बाबतीत खूप तळमळ आढळते.

४) फ्यूजनमुळे शास्त्रीय संगीतावर काही परिणाम होतो / झाला आहे का?

 प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू जशा असतात तसंच ‘फ्यूजन’ संगीताचं आहे. ‘फ्यूजन’ संगीतामुळे अनेक तरूण अभिजात संगीताकडे आकर्षिले जातात हे माझं तरी निरीक्षण आहे. पण अभिजात संगीताची व्याप्ती आणि त्याचं संपूर्ण दर्शन हे केवळ शास्त्रीय संगीताच्या मैफलीतच घडतं. त्यातून छोटेखानी मैफिलीत तुम्ही हे संगीत जास्त जवळून अनुभवू शकता. थिएटर किंवा २-२ हजार लोकांच्या ‘इव्हेन्ट’मध्ये मैफलीची ‘इंटिमसी’ हरवते आणि अनेक नाजुक गोष्टी सांगता येत नाहीत. केवळ ‘स्लोगनवजा’ बंदिशींची मांडणी होण्याचा धोका वाढतो.

५) शास्त्रीय संगीताला तरूण पिढीने ग्लॅमर मिळवून दिलं आहे असं तुम्हाला वाटतं का?

‘ग्लॅमर’ या शब्दाचा आपण नेमका कसा अर्थ लावतो त्यावर या प्रश्नाच्या बाबतीत माझं मत ठरेल. तरूण लोक गातात तेव्हा आपोआपच एक प्रकारची ऊर्जा, उत्साह आणि नवता त्या सादरीकरणात येते. शिवाय जास्तीत जास्त तरूण श्रोत्यांमध्ये असले तर पुरेसं ग्लॅमर या संगीतप्रकाराला मिळेल असं मला वाटतं. शिवाय केवळ तरूण लोकांमुळे हे ग्लॅमर मिळत नाही, तर खरं ग्लॅमर या क्षेत्रातले प्रतिभावंत लोक मिळवून देतात.

पण ‘ग्लॅमर’ या शब्दाला जसं एक चंदेरी वलय आहे तसंच त्याला एक तात्पुरतेपणाचीही छटा आहे. मुळात मी जसं म्हटलं की या संगीतप्रकाराला एका ठहरावाची गरज आहे. याला ‘ग्लॅमरची’ कमी आणि अभिरुचीची जास्त गरज आहे. ग्लॅमर असूच नये असं मी म्हणत नाही. पण नुसतंच ‘ग्लॅमर’ नसावं असंही मला वाटतं. कारण ‘ग्लॅमर’ आणि अभिरुची यांचं प्रमाण व्यस्त झालं तर कलेचं मूळ स्वरूप बदलण्याची शक्यता असते.

What do you think?