राजकीय स्फूर्तिगीतं अथवा मुद्रागीतं करणं हे संगीतकारासाठी अत्यंत आव्हानात्मक तरी सृजनात्मक समाधान (creative satisfaction) देणारं काम आहे. मला सगळ्यात जास्त आवडणारं राजकीय गीत म्हणजे अवधूत गुप्तेने केलेलं शिवसेनेचं पक्षगीत! मुखड्यामध्ये चढत्या क्रमाने ऊर्जा एकत्रित करत जायची आणि मग हुकलाइनला त्या ऊर्जेचा कळस गाठायचा हा बहुतांश राजकीय गाण्यांचा फॉर्म्युला असतो. शिवसेनेच्या गाण्यात हा फॉर्म उत्तम वापरला आहे.
पण राजकीय गाण्यांना अनेक वेगवेगळ्या छटा असू शकतात. मूलतः दोन प्रकारात मोडतात. एक ॲंथम अथवा मुद्रागीतासारखं काही – ज्याला वेळेचं परिमाण नाही – उदाहरणार्थ शिवसेना गीत. हे कायमस्वरूपी शिवसेना गीत राहील. दुसऱ्या प्रकारचं गीत म्हणजे ज्याला वेळेचं परिमाण आहे. उदाहरणार्थ, निवडणुकांसाठी केलेली गाणी. ही गाणी मतदारांच्या मनात ठसण्याकरता फार कमी वेळ असतो. मग ही गीतं कुठल्यातरी प्रसिद्ध गाण्याच्या चालीवर लिहिली जातात. सत्तेतला पक्ष असेल तर त्यांची गाणी ही आपली चांगली कामं प्रतीत होतील अशी लिहिली जातात. ती काही प्रमाणात गंभीर असू शकतात, पण गाणं विरोधी पक्षासाठी तर मात्र यात उपरोध आणि विनोद यांचा मारा असतो. २००४च्या निवडणुकांमध्ये मी कॉंग्रेस पक्षासाठी गाणी केली होती. त्यावेळी केंद्रात भाजपाची सत्ता होती आणि महाराष्ट्रात कॉंग्रेसची. त्यामुळे ४ गाण्यांपैकी दोन गाण्यांमध्ये भाजपाची यथेच्छ टिंगल आणि त्यांच्या धोरणांवर टीका होती. उरलेल्या दोन गाण्यांमधल्या एका गाण्यात कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातल्या शासनाने राबवलेल्या विविध योजनांचं गुणगान होतं. आता या गाण्यांमध्ये ‘मागासवर्गीय सामुहिक लग्न’ किंवा ‘कन्यादान योजना’, ’वीज बचत योजना’ अशी योजनांची नावं आली पाहिजेत असा पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा अनेकदा आग्रह असतो. कॉंग्रेसची ही गाणी माझा मित्र अमोल ठाकुरदास याने लिहिली होती आणि त्याने तर जवळजवळ कॉंग्रेसचा मॅनिफेस्टोच गीतरूपात आणला होता! त्या काळात यूट्यूब अगदीच बाल्यावस्थेत होतं त्यामुळे ही गाणी केवळ श्राव्य स्वरूपात राहिली. यथावकाश ही गाणीसुद्धा मी माझ्या यूट्यूब वाहिनीवर टाकेनच.
या गाण्यांमध्ये एक गाणं तत्कालीन मुख्यमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे यांच्यावर होतं. एका अर्थानं ते एका व्यक्तीचं गुणगान असतं. हे गाण्यात करणं कठीण असतं. जरा तोल गेला तर गाण्याबरोबर त्या व्यक्तीचंही हसं होऊ शकतं आणि गीतकार आणि संगीतकाराला हा तोल सांभाळावा लागतो.
अवधूतनेच केलेलं आणखी एक गाणं मला फार आवडतं ते म्हणजे मनसेसाठी त्याने केलेलं ‘तुमच्या राजाला साथ द्या!’ यूट्यूबवर अशी अनेक गाणी सापडतात. स्थानिक नेत्यांच्या गाण्यांमध्ये स्थानिक संगीताचे काही एलिमेन्ट्स् वापरले जातात.
अनेकदा गाणं एका पक्षासाठी असलं तरी ते इतकं लोकप्रिय होतं की दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्तेही तेच गाणं त्यांच्या रील्समध्ये वगैरे वापरतात. या संदर्भात विजू माने या आमच्या मित्राने अवधूत गुप्तेची मुलाखत त्याच्या यूट्यूब वाहिनीवर घेतली आहे ती पाहण्यासारखी आहे.
मागच्या निवडणुकीत मी भाजपसाठी – मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक गाणं केलं होतं. काही दिवसांपूर्वी तेच गाणं मा. अजितदादा पवार आणि मा. सुप्रियाताई सुळे यांच्या एका रीलमध्ये वापरलेलं मला आढळलं! संगीत सगळ्या भेदांपलीकडे जाऊन उरतं ते असं!
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अचानक राजकीय उलथापालथ झाली आणि महाआघाडी सरकार जाऊन महायुती सरकार आलं. मा. एकनाथराव शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ठाण्यातले ते पहिलेच मुख्यमंत्री असल्याने ठाणेकरांनी आणि शिंदेसाहेबांच्या चाहत्यांनी एक भव्य सत्कारसोहळा त्यांच्यासाठी गेल्या आठवड्यात आयोजित केला होता आणि त्यासाठी एक गाणं करावं असा एक विचार सत्कारसमितीच्या लोकांच्या मनात आला. अशोक बागवे सरांनी ते गाणं लिहिलं आणि मी त्या गाण्याला चाल दिली. नंदेश उमप या माझ्या लाडक्या गायकाने ते गीत गायलं. आत्ता ७:३० वा. ते गाणं अनुराग म्युझिक स्टुडियोच्या यूट्यूब वाहिनीवर प्रकाशित होतंय.