दीपस्तंभ

Shankar Vaidya at Shubhra Kalya Moothbhar Album Release

PC - Sanjay Pethe

रवींद्र नाट्यमंदिर या मुंबईच्या सभागृहाच्या पुरुषांच्या प्रसाधनगृहात योगायोगाने एका विद्यार्थ्याची भेट एका कवीशी होते आणि अवघ्या ३ मिनिटाच्या कालावधीच्या त्यांच्या संभाषणातून विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्याचं गमक सापडतं. या एका वाक्यावरून हे एका काल्पनिक कादंबरीच्या ब्लर्बवरील वाक्य आहे असं कुणालाही वाटू शकेल. आणि तरीही हे माझ्याबाबतीत घडलं आहे.

‘दीपस्तंभ’ या लेखाचं अभिवाचन

२३ सप्टेंबर २०१४. सकाळी उठलो आणि सवयीप्रमाणे किती वाजले पहायला मोबाइल हातात घेतला तर एक एसएमएस होता.

“शंकर वैद्य सर गेले.”

मी डोळे मिटून घेतले. बातमी धक्कादायक नव्हती, पायाखालची जमीन सरकवणारी नव्हती, पण तरीही आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे, याची जाणीव करून देणारी होती. शंकर वैद्य सरांचा वावर अतिशय मंद्र असायचा. त्यांचं बोलणंही मृदू आणि खालच्या पट्टीतलं असायचं. तसंच त्यांचं जाणंही हलक्या पावलाने झालं.

शंकर वैद्य सरांना मी पहिल्यांदा भेटलो ते १९८७ साली. म्हणजे त्याला आता २७ वर्षं झाली. मी नुकताच रुपारेल महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला होता. शाळेत असल्यापासून माझ्यावर मराठी कविता आणि संगीतापेक्षाही उर्दू आणि हिन्दी काव्य-संगीताचा प्रभाव अधिक होता. मेहदी हसन, ग़ुलाम अलि यांच्यामुळे ग़ज़लचं वेड लागलं आणि त्यामुळे मराठीत सुरेश भट आवडू लागले. इतक्या भांडवलावरच महाविद्यालयात पोहचेपर्यंत कविता करण्याची उर्मी तयार झाली होती.

माझ्या आईच्या एका मैत्रिणीने माझ्या कविता वाचून शंकर वैद्य सरांना भेटण्याचा सल्ला दिला. वैद्य सर तिच्या ओळखीचे असल्याने त्यांना फोन करून सांगितलं देखील. वैद्य सरांनी पुढच्या रविवार सकाळची वेळ दिली. माटुंग्याच्या ‘अफ्रिका हाउस’ या त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेरच बराच वेळ घुटमळत राहिलो. आपली अपरिपक्व कविता इतक्या मोठ्या कवीला कशी काय दाखवावी हा विचार सतत मनात येत होता. शेवटी मनाचा निर्धार केला आणि आत गेलो.

वैद्य सरांनी हसून स्वागत केलं. सरोजिनीबाईंशी माझी ओळख करून दिली. मी अजूनही अवघडल्यासारखा या दुविधेत होतो की यांना कवितेची वही दाखवावी का नाही. पण वैद्य सरांचं हसणं इतकं लाघवी होतं की आपल्या वडीलधार्‍या माणसाकडून कौतुक करून घेण्यासाठी आपण त्यांना वही देत आहोत, समीक्षकाकडून टीका करून घ्यायला नाही असा दिलासा त्यांच्या प्रेमळ नजरेतूनच मिळाला! मी अलगद वही त्यांच्याकडे सरकवली. त्यांनीसुद्धा ती नीट हातात घेतली. वही उघडताक्षणी त्यांनी पहिली टिप्पणी केली ती अक्षरावर.

“अक्षर छान आहे तुमचं.”

मग पुन्हा बराच वेळ ते वहीतली एक अन् एक कविता वाचण्यात मग्न झाले. मी वहीच्या आडून त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न करीत होतो, कविता त्यांना आवडतायत का याचा अंदाज घेत होतो. पण त्यांच्या चेहर्‍यावरून काहीच समजेना! शेवटी मी तो नाद सोडून दिला.

वही वाचून झाल्यावर वैद्य सरांनी अतिशय मृदू स्वरात कवितांचं विश्लेषण सुरू केलं. आता इतक्या वर्षांनी त्यांनी काय विश्लेषण केलं हे मला नेमकं आठवत नाहिये पण कुठेही अवास्तव कौतुक केलं नाही की मनाला लागेल अशी टीका केली नाही. मला इतकंच आठवतंय की ‘अफ्रिका हाउस’मधून मी बाहेर पडलो तेव्हा कविता लिहिण्याची माझी उमेद शाबूत होती आणि उर्मी जिवंत होती.

त्यानंतर महाविद्यालयाची पाच वर्षं गेली आणि माझं कवितालेखन तसंच सुरू राहिलं. कविता छंदात लिहिता यावी यासाठी ती मी ‘तरन्नुम’मधे म्हणायला सुरूवात केली आणि लक्षात आलं की आपल्याला कवितेला चाल लावण्यातही आनंद मिळतोय. तरीही हे चाली देण्याचं प्रकरण मी स्वतः रचलेल्या कवितांपुरतंच मर्यादित होतं. चेतन दातारच्या सहवासात मला नाटकाची आवड लागली आणि थोड्याफार प्रमाणात मी एकांकिकाही लिहू लागलो. पण महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षापर्यंत करियरचं काय करायचं याबाबत मनात संभ्रम तसाच कायम होता. एकीकडे कलांची आवड, लिखाणाची हौस, संगीताचं वेड आणि दुसरीकडे एका मोठ्या, व्यावहारिक जगाला सामोरं जाण्याचं दडपण. परीक्षा झाली, निकाल आले, ग्रॅज्युएट झालो तरी आयुष्यात पुढे काय करावं हे ठरत नव्हतं. मला वाद-विवादाचं अंग चांगलं आहे असं माझ्या वडिलांचं म्हणणं असल्यामुळे त्यांच्या सल्ल्याने मी रुपारेल महाविद्यालयाच्याच आवारात असलेल्या न्यू लॉ कॉलेजात ॲड्मिशन घेतली. यात माझा एक छुपा हेतू असा होता की रुपारेल महाविद्यालयात असतांना नाटकाशी जुळलेला माझा संबंध तसाच पुढे अखंड सुरू राहील. तेच मित्र असतील, तेच कॅन्टीन असेल आणि त्याच तालमी असतील!

एक वर्ष सरत आलं. लॉमधे मला रस निर्माण झाला होता; पण नाटक, गाणं – बजावणं यात जसं मन रमत होतं तसं इतर कशातच रमत नव्हतं. मी लॉचा विद्यार्थी असलो तरी माझे मित्र सगळे रुपारेलचेच होते. तशातच नाटकाच्या निमित्ताने रुपारेलमधे कमलेश भडकमकर, अजित परब, ओंकार दादरकर, शिल्पा पै, प्रतिभा दामले असे संगीतातले लोकही एकत्र आले. सकाळी लॉची लेक्चर्स झाली की उरलेला वेळ या सगळ्या संगीत, नाटकामध्ये रमणाऱ्या मित्रांबरोबर घालवणं हा नित्यक्रम बनला.

फेब्रुवारीचे दिवस होते. रुपारेलच्या मराठी विभागातर्फे कुसुमाग्रजांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम करायचा होता. मी लॉ कॉलेजचा विद्यार्थी असलो तरी रुपारेलमधले बरेचसे प्राध्यापक मला रुपारेलचा विद्यार्थीच मानायचे. त्या दिवशी मी वर्गात लॉचा अभ्यास करत बसलो होतो तेव्हा एक प्राध्यापिका माझ्याकडे कुसुमाग्रजांच्या कवितांचं पुस्तक घेऊन आल्या.

“कौशल, हे पुस्तक घे. थोड्यावेळात कार्यक्रम सुरू होतोय. कार्यक्रमाचा समारोप कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकार’ या कवितेने करावा असा माझा विचार आहे. पण आयत्यावेळी गायला कुणी मिळत नाहीये तेव्हा आता तूच गा!”

“अहो, पण मला चाल माहीत नाहीये या गाण्याची!” – मी म्हटलं.

“तू गा न तुझ्याच चालीत!” असं म्हणत प्राध्यापिका निघून गेल्या.

या आधी मी दुसऱ्याने लिहिलेल्या एखाद्याच कवितेला चाल दिली असेन. आणि ‘संगीतकार’ होणं हे माझ्या कल्पनेच्या परीघातही नव्हतं. पण आव्हान पेलण्यात एक किक मिळत होती आणि म्हणून ते मी स्वीकारलं. मी पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिलं. नाव लिहिलं होतं – ‘रसयात्रा’. खाली कवीचं नाव – कुसुमाग्रज. आणि ‘संपादक – बा.भ. बोरकर आणि शंकर वैद्य’. अनेक दिवसांनी शंकर वैद्यांचं नाव पुन्हा ऐकण्यात आलं होतं. मी ‘गर्जा जयजयकार’ शोधायला पुस्तक उघडलं पण ज्या पानावर ते पुस्तक उघडलं गेलं त्या पानावरची कविता होती – ‘जा जरा पूर्वेकडे’. इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे पाठ्यपुस्तकातली एखादी कविता सोडली तर कुसुमाग्रजांची एकही कविता मी वाचली नव्हती. ‘जा जरा पूर्वेकडे’ या शीर्षकाने माझं जसं लक्ष वेधून घेतलं तसं कविता सुरू होण्यापूर्वी कंसात एक टीप होती. ‘चीन – जपानी युद्धात चाललेले राक्षसी अत्याचार या कवितेत अभिप्रेत आहेत.’

मी कविता वाचली आणि मला एक वेगळीच अनुभूती मिळाली. असं वाटलं की कुसुमाग्रजांनी केवळ एक चित्र डोळ्यासमोर उभं केलं नाहीये तर त्यांचा अनुभव ‘विदाउट जनरेशन लॉस’ मला ट्रान्स्फर केलाय! अवघ्या पाच मिनिटांत या कवितेला चाल सुचली… ‘सुचली’ म्हणण्यापेक्षा ‘स्फुरली’ असं म्हणणं खरं तर जास्त रास्त ठरेल. मी कार्यक्रमाच्या स्थळी (कॉलेजमधल्याच एका वर्गात) पोचलो तेव्हा कार्यक्रम सुरू होऊन काही वेळ झाला होता. समोर बघतो तर अध्यक्षस्थानी खुद्द शंकर वैद्य सर! माझ्या पोटात गोळा आला. एकदा अर्ध्या कच्च्या कविता वाचायला दिल्या ते ठीक – आता नवोदिताची चालही त्यांनाच ऐकवायची म्हणजे फारच झालं असं राहूनराहून वाटू लागलं.

विद्यार्थ्यांच्या एका छोट्याशा कार्यक्रमानंतर शंकर वैद्यांनी स्वत:च्या काही रचना सादर केल्या. ‘छत्री’, ‘आम्ही पालखीचे भोई’ ह्या कविता सादर केल्याचं आजही माझ्या स्पष्ट स्मरणात आहे. कविता सादर करण्यात वैद्य सरांचा हातखंडा होता हे मला नंतर कळत गेलं. तो क्षण नुसताच भारावून टाकणारा होता. वैद्य सरांकडून ‘छत्री’ ऐकताना पुन्हा ‘जा जरा पूर्वेकडे’ वाचताना आला तोच अनुभव आला. वैद्य सरांची कविता सादर करण्याची पद्धत अतिशय प्रभावी होती. मृदू स्वरात – जवळजवळ पुटपुटल्यासारखे – ते कविता सादर करत पण उच्चार अतिशय सुस्पष्ट. आवाजात विशेष चढउतार नाहीत पण शब्दांचा वेग कमी जास्त करून परिणाम साधण्याची हातोटी आणि नेमक्या ठिकाणी त्यांचे पिंगे डोळे लुकलुकायचे… हे सगळंच त्या क्षणी मी नव्याने शिकत होतो. समजून घेत होतो!

कार्यक्रमातली शेवटची कविता झाली आणि प्राध्यापिका बाईंनी घोषणा केली –

“कार्यक्रमाचा शेवट कौशल इनामदार ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ हे गाणं म्हणून करेल.”

बाईंना ठाऊकच नव्हतं की मी ‘जा जरा पूर्वेकडे’मधेच इतका रमलो की ‘गर्जा जयजयकार’पर्यंत माझी गाडी गेलीच नव्हती. मी सर्वांची माफी मागितली आणि म्हटलं की मी ‘गर्जा जयजयकार’च्या ऐवजी ‘जा जरा पूर्वेकडे’ ही कविता सादर करणार आहे. गाणं म्हणायला सुरुवात केली आणि उत्स्फूर्तपणे वर्गात बसलेल्या मुलांनीही माझ्यासोबत ती गायला सुरूवात केली! मीच भारावून गेलो असल्यामुळे वातावरणही कवितेने भारलं. शेवटचं कडवं झालं तेव्हा समोर बसलेल्या अनेकांचे डोळे पाणावले होते. टाळ्या सुरू व्हायला एका क्षणाचा विलंब लागला पण मग धोधो टाळ्या बरसल्या. नंतर जमलेल्या गर्दीत बाईंनी वैद्य सरांशी माझी ओळख करून दिली पण त्यांच्याभोवती चाहत्यांचा गराडा खूप असल्यामुळे फार काही संभाषण होऊ शकलं नाही.

कार्यक्रम संपवून मी खुषीतच कॅन्टीनच्या दिशेने कूच केली. हा सगळाच अनुभव खूप समृद्ध करणारा होता. चहा पिऊन हा सेलिब्रेट करायलाच हवा होता. कॅन्टीनमधे माझा मित्र सुमीत राघवन भेटला. एकत्र चहा प्यायल्यानंतर तो म्हणाला –

“आज संध्याकाळी रवींद्र नाट्यमंदिरात गजाननराव वाटवेंना ‘लता मंगेशकर पुरस्कार’ मिळणार आहे. वाटवेंच्या गाण्याचा कार्यक्रमही आहे त्यानंतर. या सोहळ्याचे दोन पासेस आहेत माझ्याकडे. तुला माझ्याबरोबर यायला आवडेल का?”

माझी काय बिशाद नाही म्हणायची! असा कार्यक्रम कोण सोडणार?

संध्याकाळी मी आणि सुमीत त्या कार्यक्रमाला रवींद्र नाट्यमंदिरात गेलो. मध्यंतरात प्रसाधनगृहात शिरत असतांना शंकर वैद्य सर बाहेर पडत होते. मला बघून तेही क्षणासाठी स्तंभित झाले. मग ओळखीचं हसले आणि म्हणाले –

“इनामदार न तुम्ही?”

मी हो म्हटलं.

“छान झालं आज सकाळचं गाणं. त्या गाण्याची चाल तुम्ही दिली होती?”

मी पुन्हा होकारार्थी मान डोलावली.

“काय करता तुम्ही इनामदार?”

“सर, मी लॉ शिकतोय.”

“ते सोडा. तुम्ही संगीतच करा! मी हे जबाबदारीने बोलतोय.”

इतकं बोलून ते निघून गेले. ज्यांना शंकर वैद्य सर परिचित होते त्यांच्या ताबडतोब ध्यानात येईल की ते शब्द अतिशय मोजूनमापून वापरायचे. त्यांचं वाक्य सहज होतं पण कॅज्युअल नव्हतं. मी त्या रात्री खूप विचार केला. मी संगीतकार व्हावं, संगीत दिग्दर्शन व्यवसाय म्हणून स्वीकारावा याचा निर्णय मी एका रात्रीत घेतला नाही. पण त्या निर्णयापर्यंत पोचण्याकरिता वैद्य सरांच्या या वाक्याचं योगदान प्रचंड होतं हे मला जसं तेव्हा कळलं तसं आजही जाणवत राहतं.

आणि म्हणूनच १९९५ सालच्या जूनमध्ये मी जेव्हा माझ्या चालींचा पहिला कार्यक्रम करायचं ठरवलं, तेव्हा शंकर वैद्य सरांनाच प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची विनंती केली. त्यांनी येण्याचं मान्य केलं हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. माझा पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे आणि सगळेच कलाकार नवखे असल्यामुळे कार्यक्रमाच्या यशाबद्दल माझे सगळेच हितचिंतक साशंक होते. अनेकांनी मला “तुला वाटत असेल की लोकांनी तुझी गाणी ऐकावी तर दोन जुन्या गाण्यांमधे तुझं एक नवीन गाणं ‘घुसव’!” असा प्रेमळ सल्ला देऊन माझं मनोबल वाढवण्याचा प्रयत्नही केला!

कार्यक्रम उत्तम पार पडला. आम्ही सगळे १८-२४ या वयोगटातले होतो. इंग्रजी माध्यमात शिकलेली लहान लहान मुलं ग्रेस आणि मर्ढेकरांची कविता गाताहेत पाहून अनेक रसिक स्तिमित झाले.  याची पावती म्हणून आमच्यावर टाळ्यांचा आणि कौतुकाचा वर्षावही केला. शंकर वैद्य सरांनीही आपल्या भाषणात आमचं कौतुक केलं. पुढच्या मार्गाबद्दल सावधही केलं. कधीही कौतुक करण्याच्या भरात मी त्यांना वाहवत जातांना पाहिलं नाही की त्यांच्या टीकेला जराही कटुतेची धार पाहिली नाही. त्यांचं सगळंच वागणं-बोलणं संतुलित असायचं.

(अमृताचा वसा या कार्यक्रमात कवीवर्य शंकर वैद्यांनी केलेलं भाषण. दिनांक – २५ जून १९९५)

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आमच्या घरचा फोन वाजला. माझ्या आईने तो घेतला आणि मला खुणेने बोलावलं. तिच्या चेहर्‍यावर आनंद होता. मला फोन देताना म्हणाली – “शंकर वैद्यांचा फोन आहे.”

मी फोन घेतला. वैद्य सरांनी पुन्हा एकदा कार्यक्रम चांगला झाल्याबद्दल अभिनंदन केलं. मग म्हणाले –

“घरी येऊन जा. तुला दोसा खायला घेऊन जायचंय मला.”

सगळ्या टाळ्या, वन्स मोअर एकीकडे आणि वैद्य सरांचं हे प्रेमळ आमंत्रण एकीकडे! दुसऱ्याच दिवशी मी त्यांच्या घरी गेलो.

किंग्ज सर्कललाच ‘आनंद भुवन’ या हॉटेलमधे दोसा खायला गेलो. कविता, संगीत, आमचा कार्यक्रम असे बरेच विषय झाले. खाऊन झाल्यावर म्हणाले – “आपण पाच बागेत जरा फिरायला जाऊ.”

आम्ही पाच बागेपर्यंत चालत गेलो. थोडं चालून झाल्यावर एका बाकावर बसलो. बसल्यानंतर पुन्हा एकदा म्हणाले –

“छान झाला कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे खूप प्रयोग होतील.”

मी ऐकत होतो. ते पुढे म्हणाले – “मागे तू मला रवींद्रमध्ये भेटलास तेव्हा मी तुला सांगितलं की तू संगीतातच काहीतरी करायला हवंस.”

त्यांना ते अजून आठवत होतं याचं मला आश्चर्य वाटलं आणि तसं मी बोलूनही दाखवलं.

“तेव्हांच जाणवलं होतं मला की तुझं प्राक्तन संगीतामध्ये आहे. काल कार्यक्रम पाहिल्यावर खात्री पटली. मला असं वाटतं की आता तुझ्या मनात कुठलाही संभ्रम असता कामा नये.”

मी हसलो. खरोखर माझ्या मनात संभ्रम होता. तोवर मी काही टीव्ही मालिकांसाठी पटकथा लिहायचं काम करू लागलो होतो. लिखाण करावं का संगीत असा पेच होताच.

“तुमचा संचही छान जमलाय. तुम्हाला एकत्र बघून जाणवतं की तुम्ही एका ध्येयाने प्रेरित आहात. एक गोष्ट तू ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. आज तुमचा ग्रूप छान जमलाय. पण लोक हळूहळू आपापल्या आयुष्यात व्यग्र होतात. मुलींची लग्न होतात. लोक आपापल्या मार्गाला लागतात. आज ज्या गोष्टीला प्राधान्य आहे ते उद्या नसणार. तू या सगळ्या परिस्थितीसाठी तयार असणं गरजेचं आहे. आणि हे कार्यक्रम करता करता अजूनही काहीतरी करत राहिला पाहिजेस.”

मी सरांकडे पाहत राहिलो. त्यांच्या बोलण्यात जराही निराशेचा किंवा नकारात्मक सूर नव्हता. आपुलकी होती. सत्य उलगडून सांगतांनाही त्यांच्या चेहऱ्यावर एक आश्वासक भाव होता. ते मला सावध करत होते पण मी घाबरून जात नाही याची काळजी घेत होते. आणि हे सगळं सहज करत होते. त्यानंतर पाऊण एक तास ते बोलत होते. माझ्या मनातल्या अनेक अबोल शंकांचं ते मी न विचारताच निरसनही करत होते. मला असं वाटतं की त्या दिवशी मी घरी परतलो तो थोडा मोठा होऊन परतलो. अधिक समंजस होऊन परतलो.

वैद्य सर म्हणाले तसंच झालं. मुलींची लग्न झाली. त्या व्यवसायानिमित्त किंवा संसारानिमित्त वेगळ्या शहरात निघून गेल्या. इतर मुलं आपापल्या आयुष्यात व्यग्र झाली. काही वर्षांनी ‘अमृताचा वसा’चे कार्यक्रम थांबले. पण हे सगळं मला एका सम्यक दृष्टीने पाहता आलं ते वैद्य सरांबरोबर घालवलेल्या त्या पाच बागेतल्या बाकड्यावरच्या संध्याकाळमुळे. कार्यक्रम थांबल्याबद्दल किंचितही कटुता, निराशा मनात राहिली नाही आणि उलट तो एक प्रगतीचा टप्पा म्हणून मला त्याकडे सकारात्मक नजरेने पाहता आलं. ’अमृताचा वसा’ या कार्यक्रमाला तेरा वर्षं झाली तेव्हा मी पुन्हा वैद्य सरांनाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं. एका नव्या चमूने हा कार्यक्रम सादर केला आणि पहिल्या कार्यक्रमात भाग घेतलेले माझे सगळे सहकारी आपापल्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून आनंदाने तो कार्यक्रम पहायला आले होते! गंमत म्हणजे या कार्यक्रमात वैद्य सरांनी मी पहिल्यांदा कवितेची वही घेऊन त्यांच्या घरी गेलो होतो ती आठवण सांगितली!

‘अमृताचा वसा’ या कार्यक्रमाला १३ वर्षं झाली तेव्हा मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया

त्यानंतर कुठल्याही कवितेसंदर्भात काही अडलं की मी शंकर वैद्य सरांनाच विचारीत असे. अगदी सहज घडलेल्या त्यांच्या भेटीतही ते एखाद्या कवितेच्या गावात फिरवून आणयचे.

एके दिवशी मी पार्ल्याला कुठल्याशा कार्यक्रमाला गेलो होतो. त्याच कार्यक्रमाला वैद्य सरही आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही पार्ल्याहून दादरपर्यंत लोकल पकडली. गाडीला गर्दी खूप होती पण वैद्य सर कवितेबद्दल इतकं सुंदर बोलत होते की गर्दीचं विशेष काहीच वाटत नव्हतं. दादर आलं तसे आम्ही दरवाज्यापाशी आलो. गाडीच्या दरवाज्यातून बाहेर पाहिलं. पौर्णिमेचा चंद्र दिसत होता. चंद्राभोवती काही ढग होते. वैद्य सरांचं त्या दृश्याकडे लक्ष वेधलं तसे ते म्हणाले –

“बालकवींची एक कविता आहे ‘मोहिनी’.

या शुभ्र विरल अभ्रांचे शशीभवती नर्तन चाले…

मी म्हटलं –

“वा! अगदी तेच दृश्य आहे!”

वैद्य सर म्हणाले – “तू चाल दे या कवितेला.”

मी बरं म्हणालो. बालकवींचं पुस्तक होतं घरामध्ये. घरी येऊन लगबगीने ते पुस्तक काढलं. ‘मोहिनी’ नावाची कविता काढली. कविता चार पानी होती आणि कवितेच्या शेवटी ‘अपूर्ण’ अशी टीप होती! हे भयानक प्रकरण होतं! चार पानी कवितेला कशी काय चाल देणार! मी ताबडतोब वैद्य सरांना फोन लावला.

“सर, ही कविता चार पानी आहे!”

वैद्य सर हसले.

“या कवितेच्या पहिल्या बारा ओळी वाच. फक्त पहिल्या बारा ओळींना चाल द्यायची.”

मी वाचल्या. पहिल्या वाचनात फक्त शब्दांचे नाद सुखावत होते पण अर्थ मनावर बिंबत नव्हता. 

या शुभ्र विरल अभ्रांचे
शशीभवती नर्तन चाले
गंभीर धवळली रजनी
बेभान पवन ही डोले

तंद्रीतच अर्धी मुर्धी
लुकलुकते ताराराणी
ये झुंजुमुंजू तेजाने
पूर्वेवर पिवळे पाणी
निस्पंद मंद घटिका ती,
अंधुकता धुंद भरीत
ब्रह्मांडमंदिरी गाई
सौभाग्य सुभग संगीत

निद्रिस्त नील वनमाला,
निद्रिस्त सरोवर खाली
वर मूक मोहने जैसी
शशिकिरणे विरघळलेली
इवलाच अधर हलवून,
जल मंद सोडिते श्वास
इवलाच वेल लववून,
ये नीज पुन्हा पवनांस
निश्चिंत शांति-देवीचा
किंचितसा अंचल हाले
रोमांच कपोली भरती
कुंजात कोकिला बोले!

वैद्य सर पुढे म्हणाले –

“वाचलंस की तुझ्या ध्यानात (एव्हाना तुमच्या ध्यानात आलंच असेल की ‘ध्यानात’ हा वैद्य सरांचा आवडता शब्द होता!) येईल की पहिल्या दहा ओळीत कुठलाही आवाज होत नाही. सगळं शांत आहे. आता शब्दही पहा – ‘या शुभ्र विरल अभ्रांचे’ पुढे… ‘तंद्रीतच अर्धीमुर्धी…’ ‘इवलाच अधर हलवून’… अकराव्या आणि बाराव्या ओळीत जेव्हा ही शांतता भंग होते, तेव्हा ही – ‘निश्चिंत शांतिदेवीचा किंचितसा अंचल हाले…’ ही शांतता भंग होते  – तीही कशाने तर कोकिळेच्या बोलण्याने!”

हे ऐकून मी थक्क झालो! कसं सुचलं असेल हे बालकवींना, असा भाबडा प्रश्न मलाही लगेच पडला. या बारा ओळी एकाच क्षणाचं वर्णन करत होत्या. रात्र आणि पहाटेच्या उंबऱ्यावरचा क्षण… प्रत्येक ओळीबरोबर मला असं जाणवत होतं की बालकवींनी एक व्हर्च्युअल रिअलिटी निर्माण केली होती. “इवलाच अधर हलवून जल मंद सोडिते श्वास…” असं वाचतांना नुसतंच डोळ्यासमोर चित्र उभं राहात नव्हतं तर प्रत्यक्ष आपल्याच अंगावरून वाऱ्याची झुळूक गेल्याचा अनुभव होत होता. हाच तो छोटासा साक्षात्कार! कलेचं सामर्थ्य एकाचा अनुभव दुसऱ्यालाही घेऊ शकता येतो यात आहे, आणि काळाच्या सीमारेषाही त्यात पुसल्या जातात!

जी. ए. कुलकर्णींनी म्हटलंय की कविता वाचल्यावर अनेक पक्षी एकत्र उडाले आहेत असं वाटलं पाहिजे. बालकवींची ही कविता वाचून माझ्या मनातही अनेक पक्षी एकत्र उडाले! अर्थात हे सगळं मधे कविवर्य शंकर वैद्य होते म्हणून अधिक सूक्ष्मतेने अनुभवता आलं.

(या शुभ्र विरल अभ्रांचे)

मराठी अभिमानगीत करायच्या आधी मी वैद्य सरांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. तोवर ते आफ्रिका हाउस सोडून दादरच्या कामदार सोसायटीत राहिला आले होते. इथे त्यांचं वास्तव्य तात्पुरतंच असणार होतं कारण माटुंग्याच्या घराची पुनर्बांधणी होत होती. दुर्दैवाने सरोजिनीबाईंचं आणि वैद्य सरांचं निधन याच तात्पुरत्या असलेल्या जागेत झालं.

मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाला त्यांनी केलेलं भाषण मला अजून आठवतंय. भाषेबद्दलचे मूलभूत प्रश्न त्यांना कळत होते. ते त्यांनी मांडले. पण प्रश्न मांडतांनाही त्यांची भाषा नकारात्मक किंवा उपहासात्मक कधीच नसायची. त्यांच्या सान्निध्यात एक शीतलता होती ज्यात आश्वासक वाटायचं. माझ्या प्रत्येक महत्त्वाच्या उपक्रमात ते साक्षीदार आणि मार्गदर्शक म्हणून उपस्थित असायचेच.

काही दिवसांपूर्वी मी आणि माझी सहकारी आणि मैत्रीण, अस्मिता पांडे वैद्य सरांना भेटून आलो होतो. ते थकले होते. आवाज खोल गेला होता. पण बुद्धी तल्लख होती आणि काही मिश्किल बोलतांना डोळ्यातलं लुकलुकणं तसंच होतं. फक्त एकाकीपणातलं कारुण्य लपत नव्हतं. वैद्य सरांच्या सान्निध्यातल्या आश्वासकतेची इतकी सवय झाली होती की ते कधी आपल्यासोबत नसतील याची जाणीवही मनाला स्पर्श करून गेली नव्हती. यावेळी मात्र त्यांच्याकडे बघून मी आतून हलून गेलो.

आज खरोखर ते नाहीत. पण मला पाचबागेतला २४ वर्षांचा मी आणि ते त्याच बाकड्यावर बसलेले दिसतात. ते सांगत असतात – “परिस्थिती बदलणार. तू तयार राहणं गरजेचं आहे.” त्यांच्या एकमेव कावितेला चाल दिलेले शब्द माझ्या ओठांवर येतात –

पहाटेची वेळ रंग रंग अंबरी
डाळिंबाच्या रसामधी रंग केशरी
आभाळाचं पान, वर गणेशाचं ध्यान
पीतांबर झळकतो क्षितिजावरी…    
     

आणि मनात येतं – “मी तयार आहे…”

What do you think?