शाश्वताची शोधयात्रा

असं काय आहे कवितेत की माणसाला कवितेतून व्यक्त व्हावंसं वाटतं? या गोष्टीचं मला कायम कुतुहल वाटत आलं आहे. एखादा निबंध, एखादी कथा किंवा कादंबरी अधिक स्पष्टपणे अभिव्यक्ती करण्यासाठी उचित आकृतिबंध नाही का? याचं उत्तर असं असावं असं मला वाटतं – केवळ व्यक्त होणं ही माणसाची ऊर्मी नसते, तर आपण म्हटलेलं कुणीतरी समजून घ्यावं, आणि समजून घेण्यासाठी त्यामध्ये रसिकाचीही भावनिक गुंतवणूक असावी, अशीही एक आंतरिक इच्छा मानवी मनात दडलेली असते. कविता असा आकृतिबंध आहे की ती पूर्ण होण्याकरिता रसिकालासुद्धा त्या संदिग्धपणात सहभागी व्हावं लागतं, स्वतःपुरती का होईना पण दडलेल्या अर्थाची उकल करावी लागते आणि प्रस्तुत कवितेशी स्वतःचं नातं सांधावं लागतं. उर्दूतले प्रसिद्ध साहित्यिक आणि प्राध्यापक, मोइनुद्दिन जिनाबडे आमच्या उर्दूच्या वर्गात एकदा म्हणाले होते – “तुम्हें क्या लगता है, रायटर ख़ुद को एक्स्प्रेस करने के लिए लिखता है? ग़लत! वो ख़ुद को छुपाने के लिए लिखता है!” कवितेत माणूस एकाच वेळी व्यक्तही होतो आणि स्वतःला दडवतोही!

पण मला वाटतं कवितेला आणखी एक मिती आहे, आणि ती म्हणजे आत्मशोध किंवा शाश्वताचा शोध घेण्याची. कविता हा एका साधकाचा आकृतिबंध आहे. म्हणूनच कबीर ‘सुनो भई साधो’ ही साद घालतो ती छंदातून! कार्टर, किंवा हेगेलसारखा तो तत्त्वज्ञानाचे गद्य सिद्धांत मांडत बसत नाही! शाश्वताचा शोध घ्यायचा म्हणजे कधीच इष्ट स्थळी पोहोचणार नाही याची शाश्वती, पण चालत राहणं तरीही सोडायचं नाही.

धर्मराजच्या कवितेचा विषय आध्यात्म नसला तरी तिचं गोत्र हे कबीराचंच आहे असं मला या कविता वाचून वाटलं. त्याची कविता वाचताना तो व्यक्तही होतो, लपवतोही आणि त्या अनाम शाश्वताचा शोधही घेतो. मी त्याला कधीच भेटलो नाही. त्यामुळे माझ्यासाठी या संग्रहातली प्रत्येक कविता एका मोठ्या जिग्सॉ पझलचा एक तुकडा आहे. तो समजून घेण्याकरिता त्यात मलासुद्धा ही भावनिक गुंतवणूक करावी लागली. एका जिग्सॉ पझलमध्ये ताडून बघण्याकरिता जसं संपूर्ण चित्र संदर्भासाठी असतं तसं इथे त्याच्या मित्रांनी या संग्रहाबाबत जी भूमिका मांडली, ती आहे आणि धर्मराजवर लिहिलेला एक संक्षिप्त चरित्रात्मक लेख आहे. पण हे सगळं वाचूनही या सगळ्यापलीकडे धर्मराज खूप उरतो हे त्याच्या कवितेवरून जाणवतं. The whole is much more than the sum of all its parts. सितारों से आगे जहाँ और भी है!

कवितेच्या संग्रहाला प्रस्तावना असावी की नाही याबद्दल मतंमतांतरं आहेत. खरं तर ती नसावी याच पक्षातला मी आहे. कारण कवितेच्या सर्वसमावेशक संदिग्धतेवर आपल्या संकुचित अन्वयार्थाचे आरोप करणं हे मला गैर वाटतं. म्हणून मी इथे एखाद्या समीक्षकाचा आव आणून काही न लिहिता, त्याच्या कवितेने जे कुतुहल माझ्या मनात जागवलं आणि झपाटल्यासारखी एका रात्रीत मी या सगळ्या कविता वाचून काढल्या आणि पुन्हा पुन्हा वाचतो आहे, तेच कुतुहल तुमच्यातही जागवण्यापुरती ही प्रस्तावना मर्यादित ठेवेन.

धर्म या शब्दाचा अर्थ – धारयति इति धर्मः। म्हणजे धारण करतो तो धर्म. इंग्रजीत – Dharma is that which sustains. आज आपण पर्यावरणाच्या बाबतीत sustainable हा शब्द अनेकदा ऐकतो. धर्मराज याच पर्यावरणाच्या धारणेसाठी झिजला हा मला एक दैवी योगायोग वाटतो! वनपिंगळ्याच्या अस्तित्वाबद्दल त्याचं पोटतिडकीने बोलणं हे याच धर्माचं द्योतक आहे. ही कळकळ त्याच्या कवितेतून अंतःप्रवाह बनून वाहत राहते.

देखणी रे ती नदी जी धावते बंध तोडुनी
सांधते अन्‌ ते किनारे जे कधी ना भेटणारे

गुलज़ार आणि विंदा हे धर्मराजच्या कवितेतून सतत डोकावत राहतात. विंदांची सर्वव्यापी मानवता आणि गुलज़ारचा सर्वव्यापी एकांत याचं एक अजब रसायन धर्मराजच्या कवितेत दिसत राहतं. म्हणूनच कदाचित दोन हृदयांच्या अंतराळात वीज चमकते आणि शतजन्माच्या गाठींतून एक धागा निघतो जो विश्वही विणतो आणि तेही एकाच कवितेत!

गुलज़ारप्रमाणेच कुठेही न पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा धर्मराजच्याही मनात असावी. आणि या प्रवासात निसर्गच त्याचा ‘हमराही’ आहे. जणू धर्मराज निसर्गाला गुलज़ारच्या शब्दात म्हणतो आहे –

तुम कहो तो रुके; तुम कहो तो चलें
ये जुनूँ है अगर तो जुनूँ सोच लें।

तुम कहो तो रुके; तुम कहो तो चलें
मुझको पहचानती है कहाँ मंज़िलें!

इथे कुठेही पोहोचायची घाई नाही त्यामुळे कॉफीतून मुरडत उठणाऱ्या वाफेकडे पाहत बसण्याचा निवांतपणा त्याच्या कवितेत आहे. त्याचं माणसांवरचं, निसर्गावरचं, आणि कवितेवरचं प्रेम निरपेक्ष, निर्हेतुक आहे पण अलिप्त नाही! एका शहाण्या विचारवंताने म्हणून ठेवलं आहे –

“Our prayers should never be answered; for once they are answered, they remain simply correspondences.”

हा प्रवास जितका बाहेर होतो त्यापेक्षाही अधिक तो आत खोल खोल हृदयाच्याही अंतर्हृदयापर्यंत आपल्याला नेतो. या योगाने धर्मराजची कविता बालकवी, सुरेश भट, सुर्वे, नामदेव ढसाळ, रूमी, यांच्याही लेखनाशी नातं सांगते.

त्याच्या जवळजवळ सगळ्या सामाजिक कवितांमध्ये –

मी मात्र थांबून पाहतो मागे कितीजण राहिले

अशी पीडित, शोषितांच्याबाबतची सहवेदना दिसते. अर्थात अमुक एक कविता सामाजिक आणि तमुक एक आत्ममग्न असा भेद त्याच्या कवितेत करता येत नाही. त्याच्या मनात ते कप्पे नाहीत कारण मुळात धर्मराज आणि त्याची प्रतिमा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं आपल्याला वाटतच नाही. कारण सुर्व्यांप्रमाणे –

जसा जगत आहे मी, तसाच शब्दात आहे

हाच त्याच्या कवितेचा धर्म आहे.

हे सगळे जिग्सॉ पझलचे तुकडे एकत्र लावले तरी आपल्या मनात धर्मराजचं चित्र पूर्ण होत नाही कारण नियतीनेच ते पूर्ण होण्याअगोदर त्यात खंड पाडला. माझ्या मनातलं धर्मराज या माणसाबद्दलचं कुतुहल तसंच राहिलं. त्याचा कवितासंग्रह वाचून तो आपल्याला भेटतोही आणि प्रत्यक्ष त्याची भेट आता होणार नाही याची सलही आपल्या मनाला जाणवत राहते.

त्यानेच बाबासाहेबांवर लिहिलेल्या कवितेची ओळ पुन्हा पुन्हा मनात रुंजी घालत राहते.

तू हयात नाहीस असं कधी जाणवलंच नाही
अमरत्वालाही साज चढवलास तू

धर्मराजच्या कवितेमध्ये मृत्यूचा एक undercurrent सातत्याने जाणवत राहतो हे जरी खरं असलं तरी धर्मराजच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तो किती जिवंत होता याची ग्वाही त्याची कविता देत राहते.

धर्मराजच्या कवितेने मला जिवंत असल्याची जाणीव करून दिली. मीही आणि तोही! जाता जाता त्याचा पत्ता तो कवितेतच देऊन गेला.

जिथे काळ शून्य होतो
जिथे स्थळ नगण्य होते
तो तिथेच राहून गेला
एक एक शब्द बाहेर आला
आता असतो कागदावर
कविता त्याला वाचत असते.

– कौशल इनामदार
०१ मार्च २०२३, मुंबई

What do you think?