जुलैचे दिवस आले की मुंबईच्या महाविद्यालयीन नाटकवेड्या विद्यार्थ्यांना आयएन्टीच्या आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेचे वेध लागतात. या स्पर्धेचा एक नियम असा, की संहिता नवीन लागते. एखाद्या कादंबरीचं अथवा कथेचं रूपांतर चालतं परंतु आधी सादर केलेली एकांकिका या स्पर्धेत चालत नाही.
साधारण २००३-२००४चा काळ असेल. प्रा. विजय तापस सरांचा मला फोन आला की रुइया महाविद्यालयाच्या एकांकिकेचं संगीत करायचं आहे. अरुणा ढेरे यांच्या ‘कृष्णकिनारा ’ या पुस्तकातल्या काही निवडक तुकड्यांना एकत्र करून त्यांनी एकांकिका लिहिली होती. राधा अनेक वर्षांनी कृष्णाला द्वारकेला भेटायला आली आहे. गोकुळ सोडून गेल्यानंतर तो एकदाही परत का फिरकला नाही असा जाब ती त्याला विचारायला आली आहे. ही या एकांकिकेची पार्श्वभूमी.
पराग वाघमोडे या एकांकिकेचं दिग्दर्शन करत होता. पराग ‘आंतरनाट्य’ या संस्थेशी जोडला गेला होता त्यामुळे त्याचं काम मला माहित होतं. मी संध्याकाळी रुइया महाविद्यालयात या एकांकिकेच्या तालमीसाठी गेलो. तिथे मला सोनिया परचुरेही भेटली. ती स्वतः रुइयाची माजी विद्यार्थिनी होती आणि या एकांकिकेचं नृत्य-दिग्दर्शन करणार होती. काम करणार्यांपैकी आज रंगमंच आणि दूरदर्शनवर उत्तम काम करणाऱ्या प्राजक्ता हणमघर आणि ऋग्वेदी प्रधान (ऋग्वेदी म्हात्रे) या अभिनेत्री होत्या. दोघींचाही रंगमंचावरचा तसा पहिला-वहिला वावरच होता.
परागने एकांकिकेतले बसवलेले तुकडे मला दाखवले. विजय तापस सर म्हणाले की या एकांकिकेत ७ छोटी-छोटी गाणी आहेत. खरं तर त्यांना गाणुकलीच म्हणायला हवं. ६-८ ओळींचं एक एक गाणुकलं होतं.
तापस सर म्हणाले, “हातात वेळ अगदी कमी आहे. दोन दिवसात ही गाणी तयार करून मिळतील का?”
मी आत्मविश्वासाने हो म्हटलं. रुइयामधून बाहेर पडलो तेव्हा रात्र झाली होती. म्हणजे कामाला दुसऱ्या दिवसापासूनच सुरुवात करावी लागणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मला एक वेगळं काम होतं. ते करून दुपारी ४च्या सुमारास मी समीर म्हात्रे या माझ्या मित्राकडे आलो.
माझ्याकडे रोलन्ड कंपनीचा VS-1880 नावाचा एक हार्ड-डिस्क रेकॉर्डर होता. तो घेऊन मी समीरकडे आलो. त्या काळात डिजिटल रेकॉर्डिंग घरामध्ये करणं तसं रूढ झालं नव्हतं. संगणक आजच्या मानाने तसे प्राथमिकच होते. तरी ‘केकवॉक’ वगैरे सॉफ्टवेअरच्या साहाय्याने मी त्या काळात संगणकावरही घरच्या घरी ध्वनिमुद्रण करत असे. पण मोठे संगणक पोर्टेबल नसायचे. अशा प्रसंगी VS-1880सारखा एक multi-channel hard-disk recorder खूपच कामाला यायचा.
समीरकडे बसून पहिलं गाणं करायला घेतलं.
समीरची तेव्हाची सिटिंग-रूम ही दादरच्या कोहिनूर मिल कंपाउंडमध्ये होती. त्या खोलीवर आम्ही गाणी करत किती रात्री काढल्या असतील कुणास ठाऊक! पण आज मात्र रात्रीपर्यंत थांबण्याचीही फुर्सत नव्हती. रात्री १० पर्यंत ७च्या ७ गाण्यांचा ट्रॅक करून रात्रभर माझ्या घरी बसून या गाण्यांमध्ये गायकांचे आवाज डब करायचे होते. हम्सिका अय्यर आणि संजीव चिम्मलगी या दोघांना मी रात्री १० वा. माझ्या घरी बोलावलं होतं!
रुइया महाविद्यालयातला विद्यार्थी आणि माझ्या अतिशय आवडत्या संगीतकाराचा, देवदत्त साबळेंचा मुलगा, शिबु साबळे, हासुद्धा या संपूर्ण प्रक्रियेचा साक्षीदार होता. आज शिबुचा वाढदिवस आहे, त्याला मनापासून शुभेच्छा!
मनात आलं की उद्यापासून आठवडाभर या एकांकिकेचं एक एक गाणुकलं माझ्या यूट्यूब वाहिनीवर अप्लोड करेन आणि इथे त्या गाण्याच्या आठवणी सांगेन. त्यातलं पहिलं गाणं मी अपलोड केलंच आहे. त्याची कथा – उद्या.
(क्रमशः)