“चारच ओळी आहेत पण गाणं पूर्ण वाटायला हवं.“
हा एकच विचार माझ्या मनात रेंगाळत होता. कारण आता गाणं रुक्मिणीचं नसून कृष्णाचं होतं.
समीरच्या त्या सिटिंग-रूममध्ये बसून तात्त्विक विचार करायला अजिबात वेळ नव्हता. पण कुठलंही सृजन हे मूलतः बौद्धिक (intellectual) नसतं असं माझं अनेक वर्षांनंतर मत झालंय. याचा अर्थ असा नाही की त्यात बुद्धीची (intelligence) काही भूमिका नसते. उलटपक्षी, माझ्यासारखा संगीतकार, ज्याला प्रतिभेचं म्हणावं तसं वरदान नाही, त्याच्यासाठी बुद्धी हे सृजनाच्या प्रक्रियेत महत्त्वाचं साधन ठरतं. (हे विधान कुठल्याही विनम्रतेपायी मी करत नसून, वेळोवेळी माझ्या टॅलन्टची मी जी कठोर चिकित्सा करतो, त्यातून आलंय.) परंतु त्या सृजनाचा स्रोत हा बौद्धिक नसतो… किंवा नसावा. बुद्धीला शिस्त लागते. भावनेला ती नसते. भावना उत्स्फूर्त असते. कुठल्याही चांगल्या कलाकृतीचा उगम हा एका भावनिक हुंकारातच असतो अशी माझी धारणा आहे. मग जिथे कारागिरीची (craft) वेळ येते, तिथे बुद्धीचा वापर होतो.
मर्ढेकरही म्हणताना, ‘भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी’ असं म्हणतात. इथेही भावना आधी आणि मग शास्त्र येतं. शास्त्राला भावनेच्या काट्याची कसोटी त्यांनी नाही मागितली कारण ते कृत्रिम आहे!
सांगायचा मुद्दा असा की गाण्याचे शब्द डोळ्यासमोर धरले, तेव्हा इतका विचार करण्यासाठी वेळ नव्हता. माझ्याकडून शब्दांना, त्यातल्या अनुस्युत वातावरणाला जो भावनिक प्रतिसाद दिला गेला तोच त्या गीताची चाल म्हणून प्रकट झाला.
श्रीकृष्ण गोकुळ सोडून आला आहे. राधा त्याला विचारते, (शब्द वेगळे असू शकतात कारण इतक्या वर्षांनंतर मला संवाद आठवत नाहीएत) “तू गोकुळ सोडून गेलास आणि त्यानंतर पुन्हा कधीच परतला नाहीस. तुला कधीच आठवण आली नाही? तू गेल्यानंतर काय झालं असेल आमचं याबद्दल तुझ्या मनात साधं कुतुहलही जागं झालं नाही?”
या प्रश्नाला उत्तर म्हणून कृष्णाचं जे मनोगत आहे, त्याचा अर्क या छोट्या कवितेत विजय तापस सरांनी मांडलाय –
ढवळल्या आभाळाची
नको मागू काही खूण
राहू दे ना खोलवर
ओले झिम्मड गोकुळ
कशी आलीस साजणे
झाली अंधारपेरणी
नको उसवू गे वीण
झाली दीठ ओली ओली
आपल्या संस्कृतीत देवाची संकल्पना omniscient (सर्वसाक्षी), omnipresent (सर्वव्यापी), omnipotent (सर्वशक्तिमान) अशी नसून जो आपल्या विकारांवर मात करून, प्रसंगी अशक्य वाटतील इतके कठोर निर्णय घेऊन, तरीही अविचल, स्थितप्रज्ञ राहतो तोच माणूस परमेश्वराचा अवतार आहे, अशी आहे.
त्यामुळे कवींना देवाची vulnerable रूपं आवडतात. काय वाटलं असेल कृष्णाला राधेला पाहून? काय झाली असेल त्याची मनोवस्था जेव्हा त्याला गोकुळाची आठवण आली असेल? आपण होतो तसाच हळवा होत असेल का तो? माणसातला देव शोधणं जितकं आपल्याला आवडतं, तितकंच देवातला माणूस शोधणंही आपल्याला आवडतं.
हळवा झाला तरी तो श्रीकृष्ण आहे. या गाण्याची चाल करताना, थोडा मी कृष्ण झालो; थोडं श्रीकृष्णाला माझ्यासारखं केलं.
स्थितप्रज्ञ माणसाचा हळवेपणा दिसता दिसता नाहीसा होतो. म्हणून गाण्याची चाल मी फार गुंतागुंतीची न करता साधीच ठेवली. फक्त जिथे ज्या दोन ओळींमध्ये ‘नको’ हा शब्द येतो, त्या ‘नको’ शब्दातली आर्जवं वेगवेगळ्या पद्धतीने दाखवली.
संजीव हे गाणं गायला तेव्हा पहाटेचे दोन वाजले होते. रात्रीच्या नीरव शांततेत संजीवच्या धीरगंभीर आवाजात ऐकताना खरोखर डोळ्यात पाणी आलं. त्याचं गाणं ऐकता ऐकता एक गोष्ट मनात आली – की कृष्णाच्या मनात खोल कुठेतरी गोकुळातल्या त्याच्या पूर्वायुष्याची आठवण दडलेली आहे, जी राधेच्या येण्याने पुन्हा वर आली. शेवटच्या दोन ओळींची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा मी मुख्य आवाज कमी करून केवळ त्याचा प्रतिध्वनी ठेवला. गोकुळाची आठवण पुन्हा एकदा काळाच्या खोल डोहाच्या तळाशी ढकलून दिली!
© कौशल इनामदार