२३ सप्टेंबर २००३.
माझ्या मुलाचा जन्म झाला तो दिवस भाद्रपदातल्या द्वादशीचा होता. अनुरागचा जन्म जरा लवकर झाल्यामुळे त्याला ताबडतोब वांद्र्याच्या गुरूनानक इस्पितळाच्या NICU मध्ये हलवणं गरजेचं होतं. मला डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावलं तेव्हा अनुराग रडायचं थांबला होता. डॉक्टरांनी त्याला माझ्या हातात दिलं तेव्हा कंठ दाटून आला. भावनांचा इतका कल्लोळ होता मनात की त्यातून उमटणाऱ्या भावनेला काही एक नाव देता येणार नाही. तोच क्षण अविरत सुरू रहावा असं मला वाटत होतं पण माझ्या तंद्रीतून मला डॉक्टरांनी बाहेर काढलं.
“खाली ॲम्ब्युलन्स उभी आहे. बाळाला घेऊन लगेच NICU मध्ये ॲड्मिट कर. तिथे मी बोलून ठेवलं आहे”
अनुरागला एका हिरव्या कापडात गुंडाळलं आणि एका लहानशा ट्रेमध्ये ठेवलं. तो ट्रे माझ्या हातात दिला. मी त्याला घेऊन ॲम्ब्युलन्समध्ये बसलो. मी ट्रे मांडीवर घेऊन बसलो.
बाहेर पाऊस पडत होता. ड्रायव्हरने ॲम्ब्युलन्सचा सायरन लावला तेव्हा अनुरागच्या कपाळावर किंचित आठी पडल्याचा मला भास झाला. मला गहिवरूनही आलं आणि जरा हसूही. माझ्या आयुष्यातलं एक नवं पर्व सुरू झालं होतं.
***
१८ जुलै २०२४
बाबा गेले तो दिवस आषाढातल्या द्वादशीचा होता. पहाटे हिंदुजा हॉस्पिटलमधून फोन आला आणि आयसीयूमध्ये ड्यूटी असणारे डॉक्टर मला म्हणाले –
“त्यांचा हार्ट रेट अचानक कमी झाला म्हणून आम्ही त्यांना आत्ता ‘सीपीआर’ दिलं आहे. पण तुम्ही लवकरात लवकर या.”
मी आणि अनुराग ताबडतोब हिंदुजाला गेलो. वाटेत अनुरागशी मी काही बोललो का नाही ते आता मला आठवत नाही. बाहेर जितकं भरून आलं होतं त्यापेक्षा कैक पटीने आत भरून आलं होतं.
आम्ही आयसीयूमध्ये पोहोचलो तेव्हा डॉक्टर मला म्हणाले, “सीपीआर दिल्यानंतर हृदयाचे ठोके सुरू झाले आहेत पण आत्ता पुन्हा जरा ईसीजी काढत आहोत. जरा थांबा.”
काहीच वेळात डॉक्टर ईसीजी घेऊन बाहेर आले. त्यावर एक सरळ रेष होती.
त्याचा अर्थ काय असतो हे माहित असूनही एकदा खात्री करण्यासाठी मी डॉक्टरांना विचारलं,
“म्हणजे काय अर्थ आहे याचा?”
“We have to say that he’s no more.” डॉक्टरांनी अगदी मृदुपणे मला सांगितलं.
मी आत आयसीयूमध्ये जाऊन पाहिलं तर बाबा निश्चल पडले होते. शांत वाटले. खूप भरून आलं पण डोळ्यातून ते काही सांडेना.
पुढचे दोन तास काही विचार करण्याची किंवा वाटण्याचीही सवड मिळाली नाही. डेथ सर्टिफिकेट, बिलं, कागदपत्र यात गेली. अनुराग खंबीरपणे माझ्या सोबत उभा होता. राहुल काळे हा माझा मित्र हिंदुजात आला आणि त्याने आणि अनुरागने मिळून ॲम्ब्युलन्स (हर्स) सांगितली.
मी पेपरवर्क आटपेपर्यंत अनुरागचा फोन आला.
“बाबा, ॲम्ब्युलन्स खाली उभी आहे.”
ॲम्ब्युलन्समध्ये मी बसलो. या वेळी स्ट्रेचरवर बाबांचा निश्चल देह होता. आमच्या घराच्या गल्लीत गाडी शिरली तेव्हा स्पीड ब्रेकर ने थोडीशी ॲम्ब्युलन्स हलली. बाबांच्या कपाळावर आठी यावी असं मला खूप वाटलं पण बाबांचा चेहरा तसाच होता. माझ्याच डोळ्यात जरासं पाणी हलल्यासारखं वाटलं. माझ्या आयुष्यातलं एक पर्व संपलं.