‘छंद ओठांतले’ या मालिकेच्या मागच्या भागात मी शांता शेळके यांनी लिहिलेल्या ‘रिमझिम बरसत श्रावण आला’ या गाण्याबद्दल लिहिलं होतं.
रिमझिम बरसत श्रावण आला
साजण नाही आला
असं शांताबाईंनी लिहिलं होतं. शांताबाईंच्या कवितेतला न आलेला साजण हा अनेक वर्षांनंतर त्यांच्या विद्यार्थ्याच्या – म्हणजे अशोक बागवे यांच्या कवितेत आला! एका अर्थाने गुरूच्या प्रश्नाला शिष्याने दिलेलं हे उत्तर आहे. अशोक बागवे लिहितात –
झोका मंद झुले
श्रावण आला गं
मन कसे दरवळे
साजण आला गं
या मालिकेत तुम्ही अशोक बागवेंनी लिहिलेली अनेक गीतं ऐकाल. याचं कारण असं आहे की अशोक बागवेंचे शब्द आणि मी, हे एक अनोखं नातं आहे. त्यांच्या कवितेत मला संगीतकार म्हणून आव्हान मिळत राहतं. मदिरा चढावी त्याप्रमाणे ही कविता चढते. फक्त मदिरा तुमच्या सगळ्या भावना शिथिल करते. बागवेंची कविता तुमच्या भावना जास्त प्रखर, अधिक तरल, टोकदार करते. मी बागवे सरांप्रमाणे शब्दप्रभू नाही; पण त्यांच्या कवितेचा माझ्यातल्या संगीतकारावर काय परिणाम होतो हे मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो.
विचार करा की एक चित्र आहे – चंद्र, नदी, चांदणं, पर्वत, केवड्याचं रान – आता अचानक या स्थिरचित्रात चंद्र आकाशात विहार करू लागला, नदी वाहू लागली, चांदणं स्वतःचा गारवा आपल्या अंगावर शिंपडू लागलं, पर्वतांवर त्या चांदण्याच्या छायांचा एक खेळ सुरू झाला आणि केवड्याच्या सुगंधाने आपण भारावून गेलो! – ही बागवेंची कविता आहे!
‘झोका मंद झुले’ ही कविता स्वरबद्ध करणं हा माझ्यासाठी एक उत्कट अनुभव होता. प्रत्येक ओळीची चाल झऱ्यासारखी वाहत होती आणि तरीही आपण जे करतोय ते सगळं मला कळत होतं आणि अनुभवता येत होतं.
हे जरा अधिक स्पष्ट करून सांगायला हवं. एका उर्दू शेराची पहिली ओळ आहे –
रूह जब वज्द में आए तो ग़ज़ल होती है!
‘वज्द’ म्हण्जे तंद्री किंवा समाधी अवस्था. बऱ्याचदा काहीतरी सुचत असताना एका प्रकारची तंद्री लागते. ज्ञानेश्वरांच्या रेड्याने वेद म्हणावे तसं आपण गात जातो; पण आपल्याला काय सुचतंय याचा आपला आपल्याला ठाव लागत नाही. अशावेळी सुचलेली धून काही दिवसांनी ऐकली की असं वाटतं – “खरोखरच हे आपण केलंय?” कधीकधी असं होतं की आपल्याला स्फुरत काही नाही पण अनुभव, प्रशिक्षण आणि काही अंशी चातुर्याच्या आधारे आपण बाजी मारून नेतो. पण क्वचित असं होतं की आपल्यातल्या कलाकाराला ती चाल स्फुरत जाते आणि आपल्यातला श्रोता स्तब्धपणे त्या रचनेचं प्रत्येक सौंदर्यस्थळ टिपत राहतो, त्याला दाद देत राहतो! ‘एक झाड आणि दोन पक्षी’ अशी अवस्था होते!
आपण लहानपणी कथा ऐकायचो, ज्यात जादूगाराचा जीव एका पक्ष्यात असायचा. त्याचप्रमाणे काही चाली अशा असतात ज्यांचा जीव एकाच कुठल्यातरी जागेत किंवा हरकतीत असतो! या गाण्याचा प्राण ‘मंद झुले’ या शब्दांत आहे. ‘झोका मंद झुले’ हे शब्द वाचल्याक्षणी माझ्या डोळ्यांसमोर तो झोका स्लो मोशनमध्ये हिंदोळे घेऊ लागला. ‘मंद झुले’ या दोन शब्दांकडे नीट लक्ष दिलं तर जाणवेल की त्यात स्वरांचेही हिंदोळे आहेत.
लहानपणी झोपाळ्यावरून उतरल्यावर तो थांबेपर्यंत झोपाळा पाहत राहण्याचा मला छंद होता. झोपाळ्याचा वेग हळूहळू मंदावतो आणि तो आपल्या जागी स्थिरावतो ही क्रिया मला पाहायला खूप आवडायची. तो स्थिरावताना त्याची आंदोलनं कमी कमी होत जातात आणि झोपाळ्याची गती मंद होत जाते; तरी आंदोलनातलं अंतर कमी होत जातं त्यामुळे लय वाढल्याचा भास होतो ही मजेशीर गोष्ट वाटायची मला. या गाण्यातल्या ‘झुले’ या शब्दावर रिकामा झोका झुलता झुलता अलगद समेवर येऊन थांबण्याची क्रिया आहे. तसंच ‘श्रावण आला गं’ यातल्या शेवटच्या अक्षरावर सम आल्याने श्रावणाचं आगमन धसमुसळेपणाने न होता, अलगद झालंआहे हे प्रतीत होतं. मी खूप विचार केला तेव्हा माझ्या ध्यानात आलं की श्रीनिवास खळे यांनी ‘नीज माझ्या नंदलाला’ या गाण्यात हेच तंत्र वापरलं आहे. तिथेही ‘नंदलाला रे’ मधल्या ‘रे’ या शेवटच्या अक्षरावर सम येते. नीज येण्याचा तो क्षण असाच नाजूक आणि अलगदपणे येतो!
दुसऱ्या कडव्यात ‘स्पर्शसुखाची चाहूल आली’ हे शब्द आहेत. या कडव्याची चाल इतर दोन कडव्यांपेक्षा वेगळी केली. स्पर्शसुखाचा अत्यंत खासगी, तरल अनुभव आहे आणि तो बाकीच्या गाण्यापेक्षा वेगळा व्यक्त व्हायला हवा हे मनात होतं.
मला सर्वात आवडणारं कडवं शेवटचं आहे आणि खासकरून त्यातली दुसरी ओळ –
थेंबांची का नवखी थरथर
गतजन्मीचे सूर अनावर
आणि पुढच्या ओळीतलं उरी डुचमळणारं सुख हे त्या गतजन्मीच्या सुरांचं संचित आहे. मला या गाण्यातली आणखी एक प्रिय जागा म्हणजे ‘श्रावण आला गं’ यात अवचित येणारे दोन गंधार.
एवढं सगळं करून शेवटी मनात दरवळत राहते ती ओळ म्हणजे – ‘गतजन्मीचे सूर अनावर’. हे गतजन्मीचे सूर कोणते असतील असा मी विचार करतो आणि मनात येतं – ते कदाचित शांताबाईंच्या कवितेमधले ‘साजण नाही आला’चे सूर तर नसतील! या विचाराने माझ्या चेहऱ्यावर एक मंद स्मित दरवळत राहतं!
© कौशल इनामदार
8 Comments
‘मराठी अस्मिता’ वाहिनीवर हे गाणं मधुरा कुंभार यांच्या आवाजात ऐकलं होतं आणि तुझ्याकडून सुद्धा ‘कवितेचं पान’ मध्ये हे गाणं ऐकलेलं आहे. तेव्हांच ते आवडलं होतं. आता तू त्या सर्जन प्रक्रियेची सविस्तर माहिती दिल्यावर आणखी चांगल्या पद्धतीने अनुभवता आलं गाणं. ह्या मंदादोलित झोपाळ्यावरून उतरायचं मनच होत नाही, खरंच.
डुचमळे या शब्दाने कहर केला आहे. हृदयातील सुखांच्या लाटांचे हेलकावे सटीक शब्दात. क्या बात है!
पहिल्या ओळीतच ह्या चालीचा पूर्ण अर्क आहे. खूप सुखावून जाणारी चाल झाली आहे ही.
(तुझ्या सुचनेनुसार प्रतिक्रिया इथे पण टाकत जाईन आता)
धन्यवाद संदीप! हे गाणं खरं तर ध्वनिमुद्रित करायचं आहे परंतु अर्थकारण परवानगी देत नाहीए! बघू कसं जमतंय!
‘ गं ‘ मध्ये मनात खूप असलेला पण बाहेर सौम्यसा व्यक्त होणारा आनंदही छान आलाय ! याला म्हणतात, लाईफ सापडणे !
धन्यवाद चंप्र सर!
अप्रतिम वर्णन दादा गत जन्माचे सूर अनावर वाह काय संदर्भ …. सुंदर खजिना माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद… या साईट वरचे सर्व लेखन वाचत राहीन…. ❤️😊
धन्यवाद प्रसाद! नक्की वाचत रहा आणि कळवतही रहा!
सलाम
धन्यवाद! वाचत रहा आणि आपल्या प्रतिक्रिया अशाच कळवत रहा!